किल्ले पन्हाळा

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

किल्ल्याची ऊंची :  4040 ft

जिल्हा : कोल्हापूर

नमस्कार मंडळी, अलीकडे ” स्वराज्य रक्षक संभाजी “ ह्या मालिकेला खूप जास्त प्रसिद्धी प्राप्त  झाली आहे तसेच किल्ले पन्हाळगड पण तितकेच प्रसिद्ध झाले आहे. खरंच Dr. Amol Kolhe ह्यांचे आभार मानावे तितके कमी. आज आपल्याला त्यांच्यामुळेच  खरे ” छत्रपती संभाजी महाराज ” उमगत आहेत.असो तर किल्ले पन्हाळगडा बद्दल थोडा इतिहास आपल्या सगळ्यांन पर्यंत पोहोचावा असा माझा छोटा प्रयत्न.

महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही नांदता आहे. सह्याद्रीच्या कडेखांद्यावर असलेला हा गड दख्खन पठारावरील सर्वात मोठा गड आहे. पन्हाळगडाला ” दक्षिणेचा दरवाजा ” असे त्या काळी संबोधले जात होते.पन्हाळा किल्ला इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव ‘पन्नग्नालय’. पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला “पराशराश्रम” या नावानेही ओळखला जात असे. या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणार्‍या कमळांमुळे याला “पद्मालय” असे ही म्हटले जाई. ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख “ब्रम्हशैल’ या नावाने आहे.

शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला. यादवांनंतर १४८९ मध्ये पन्हाळा किल्ला विजापूरकरांकडे गेला. १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीने तो आणखी बळकट केला. इ.स. १६५९ मध्ये अफजलवधानंर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला आणि त्यावर १६७३ पर्यंत आपली मालकी कायम ठेवली होती.शिवाजी महाराजांच्या काळात या गडावर १५ हजार घोडे, २० हजार सैनिक तैनात असत. १४ किमीच्या परिसरात पसरलेल्या या गडाला ११० माच्या आहेत. अनेक भुयारी मार्ग असलेल्या या गडाचे बांधकाम विजापूर स्टाईलचे असून मोरांची शिल्पे येथे जशी दिसतात तशीच भोज राजाच्या काळातील कमळाची शिल्पेही आहेत. गडाची तटबंदी ७ किमी आहे. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. शिवाजी महाराजांनी सुमारे ५०० दिवस या पन्हाळा किल्यात सिध्दी जौहरच्या बळकट वेढ्यात काढले होते आणि अतिशय हुषारीने हा वेढा कसा फोडून त्यांनी विशाळगड गाठले होते, त्या दिवशीचा प्रसंग थोडक्यात आपल्या समोर मांडतो…

आदिलशाही फौजेचे नेतृत्व सिद्दी जौहरकडे होते, त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पौर्णिमेच्या रात्री गडावरून उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केले. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणी करण्यासाठी पाठवले होते.

या भेटी दरम्यानच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्यासहित पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे कूच केले. जेव्हा जौहरला छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत याचा सुगावा लागला तेव्हा त्याने सिद्दी मसूदला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने छत्रपती शिवाजी महाराज व साथीदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची त्यांना जाणीव झाली व काही वेळातच ते गाठतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंती केली व जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफांनी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० मावळया सहित पुढे विशाळगडावर प्रयाण केले.

खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगडगोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अशा प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली.  बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, गंगोजी महार, बांदल, महाजी, रागोजी जाधव, मोरे ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूंच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधाऱ्यांना कड्यावर चढून बाजीप्रभूंवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. बाजीप्रभू जखमी झाले तरी कोणत्याही मावळ्याने त्याही परिस्थितीत आपली जागा सोडली नाही. काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा गजर ऐकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला. मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले; जवळपास १४००० सैनिक मारले गेले. प्रत्येक मावळ्या ने ५५-६० मुगल कापून काढले, इतके शुर मावळे, इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंग्या नारायण मोरे याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले. बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते.”

पन्हाळगड ते विशाळगड हा इतिहास वाचला की खरंच अंगावर शाहारे येतात. असो तर सिद्द जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांचा  हा किल्ला विजापुररांच्या ताब्यात गेला. पण १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून महाराजांनी तो पुन्हा किल्ला ताब्यात घेतला. कोंडाजी फर्जंद ह्यांच्या शौर्या बद्दल आपण काही बोलणं योग्य नाही, इतकी त्यांची शौर्य गाथा आहे. अलीकडेच “फर्जंद” नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला. अर्थात आता तो चित्रपट सगळ्यांनी पहिला असेल नसेल म्हणून थोडी माहिती कोंडाजी फर्जंद बद्दल. पन्हाळा मोहिमेसाठी २००० तरी कोंडाजी फर्जंद याने मागणं अपेक्षित होतं. पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने? कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं. ‘राजे, ३०० गडी द्या फक्त.’  राजे अचंबित झाले! कोंडाजी म्हणला, ‘राजे, ६० च पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३०० सांगितले. ‘अवघे ३०० स्वार घेऊन स्वारी राजापूरला गेली व किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली. किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत? आणि नेमकी माहिती कळली, गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे जिथं तटबंदी विरळ आहे व पहारे सुद्धा कमी असतात. आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले, ठरलं तर ! इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५, ३ मार्च , १६७३! 

कोंडाजी ३०० जण घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपला. अनाजी दत्तो यांना सांगितलं, पंत आपण हितचं थांबा, मी ६० जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या. अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये, अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले. पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते. 

होते.इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. घोषणा, आरडाओरडा आणि त्यात कर्णे… सगळ्यांनी एकदाच आवाज धरला. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. निळोजी सबनीस म्हणून किल्ल्यावर होता. त्याला वाटलं इतके कर्णे वाजत आहेत म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे. तो ओरडत पळू लागला. सोबत अनेकांना सांगू लागला “सैन्य खूप आहे…जीव वाचवा…पळा…गनीम संख्येने फार आहे.” हे ऐकून अजून ४०० -५०० लोक पळू लागले, येवढं वजा जाता देखील किल्ल्यावर १२०० माणसं बाकी होती. ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होते, मराठे सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते.आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.

किल्लेदार पडला!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला.मग काय? सगळे सैन्य कच खाऊन पळू लागले. बघता बघता किल्ला घेतला गेला. पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती, तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला. गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले, तोफांना बत्त्या दिल्या. त्याही मराठ्यांच्या कीर्तीचे गाणे गात धडाडू लागल्या. एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला.तो स्वार किल्ल्यावर गेला तो दिवस चैत्र शु प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा! राजांना बातमी कळली आणि मग काय विचारता, राजे भारावून बोलू लागले,तोफा द्या, साखर वाटा, सरनोबत आपल्या हुजुरातीची तयारी करा! आपल्याला आज पन्हाळ्यास निघायचे!राजांनी पन्हाळ्याला जाऊन कोंडाजी व बाकी साथीदारांचे सत्कार कौतुक केले !तर असा होता पन्हाळगडावरील शिवाजी महाराजांचा इतिहास… शिवाजी महाराजांनंतर किल्ल्याचा ताबा मुघलांकडे गेला. इ.स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला. त्याच वर्षी रामचंद्र्पंत आमात्र्‍यांनी तो परत जिंकून घेतला. पुढे १७०५ मध्ये ताराराणींनी “पन्हाळा” ही कोल्हापूरची राजधानी बनविली. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणीं कडून जिंकून घेतला. इ.स. १७०९ मध्ये ताराराणीं हा किल्ला परत जिंकून घेतला . त्यानंतर १७८२ पर्यंत “पन्हाळा” ही कोल्हापूरची राजधानी होती. इ.स. १८२७ मध्ये पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. कवी मोरोपंत पराडकर यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता.पन्हाळगडावर पहाण्याची ठिकाणे :- राजवाडा, शिवमंदिर, सज्जा कोठी, राजदिंडी, अंबारखाना, चार दरवाजा, सोमेश्वर (सोमाळे) तलाव, रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी, रेडे महाल, संभाजी मंदिर(छ. राजारामांचा पूत्र संभाजी(१७१४-१७६०), धर्मकोठी, महालक्ष्मी मंदिर, तीन दरवाजा, बाजीप्रभुंचा पुतळा, शिव काशीदांचा पुतळा , पुसाटी बुरुज, नागझरी, पराशर गुहा, दुतोंडी बुरुजकोल्हापूर शहरातून बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर १ तासात जाता येते.पन्हाळगडावर राहाण्याची, जेवणाची, पाण्याची उत्तम सोय आहे. पन्हाळा किल्ला पूर्ण पाहाण्यासाठी किमान २ दिवस तरी पाहीजेत. किल्ल्यावर गाईड मिळू शकतो. त्याला बरोबर घेऊन किल्ल्यावर खाजगी वहानाने किंवा रिक्षाने फिरता येते, तसेच ज्योतिबा, पावनखिंड, विशाळगड ही ठिकाणे पाहाता येतात तर चालत जाऊन पावनगड पाहाता येते. तर असा आहे किल्ले पन्हाळा आणि त्याचा इतिहास. वरील माहितीस आपल्याला काही टिप्पणी द्यायची असेल तर जरूर कळवावे.

धन्यवाद,

मिहीर मपारा